शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. २७- सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील २११ पुलांचे निरीक्षण करण्यात आले असून, यातील ३४ पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन पुलांची उंची वाढविण्यासाठी ते नव्याने बांधण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून घडलेल्या अपघातात एका बसमधील जवळपास ३0 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या अपघाताची गंभीर दखल राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने घेतली आणि राज्यातील दोन हजार २00 पुलांचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे निर्देशही राज्यभरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयांकडे देण्यात आले. शासनाच्या या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील पुलांचे निरीक्षण करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २११ पूल आहेत. यामध्ये राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलांचा समावेश आहे.सदर मार्गावरील सर्व पुलांची तपासणी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व शाखा अभियंता यांनी अथक परिश्रम करून पूर्ण केली आणि शासनाकडे अहवाल सादर केला आहे. बांधकाम विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २११ पुलांपैकी १७५ पूल सुस्थितीत आणि त्यांची कसलीही दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, तर उर्वरित ३४ पुलांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची दुरुस्ती आवश्यक असल्याचेही स्पष्ट होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी लागणार्या खर्चाचे अंदाजपत्रकही बांधकाम विभागाने वरिष्ठ कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३0 मीटर उंचीचा एकही पूल नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. प्रशासकीय मान्यता आणि शासनाकडून प्राप्त निधीनंतरच या पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याचे अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले. अंदाजपत्रकातील खर्च वाढणार जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या ३४ पुलांच्या दुरुस्तीसह दोन नव्या पुलांच्या कामासाठी लागणार्या खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार या पुलांच्या कामासाठी जवळपास दोन कोटी ५0 लाख ते तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुचविण्यात आले असले तरी, या खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पुलांची यादी तयार करून राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठविली आहे. आता शासनाने निधीची तरतूद केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. दोन मोठय़ा पुलांची पुनर्निमिती आवश्यकजिल्ह्यातील पुलांच्या निरीक्षणादरम्यान बांधकाम विभागाच्या निदर्शनास काही बाबी आढळून आल्या. त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा नदीसह, कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील अडाण नदीवरच्या पुलाची पुननिर्मिती करण्याची गरज असल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आपल्या अहवालात आवश्यक मुद्दे उल्लेखित करून या पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. आता या पुलांची उंची किती वाढवायची, ते अद्याप निश्चित झालेले नाही.
पुलांचे ‘ऑडिट’!
By admin | Published: October 28, 2016 3:06 AM