गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ते रिसोड या दरम्यान असलेल्या पुलाची एक बाजू पूर्णत: उखडली असल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. या ठिकाणावरून पायदळ व दुचाकीने वाहनाने ये-जा सुरू आहे. मात्र, चारचाकी वाहन जात नसल्याने गैरसोय होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. रिसोड तालुक्यातील निर्माणाधीन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच कवठा जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ते व पुलांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. कवठा ते रिसोड या दरम्यानच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वप्निल सरनाईक यांनी दिला आहे.
००००