मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गेट क्रमांक १०२ औरंगाबाद-नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवर असलेला पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची दयनीय अवस्था झाली असून जड वाहने धावत असताना पूल हादरत असल्याचा अनुभव अनेकजण बोलून दाखवत आहेत. पुलावर खड्डेच खड्डे पडले असून १४ जुलै रोजी वाशिमहून जऊळका येथे वाहनाने जात असलेला रेल्वे कर्मचारी खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याची घटना घडली.
काटेपूर्णा नदीवरील याच पुलावरून काही महिन्यांपूर्वी ट्रक पाण्यात पडला होता. लहान मुलगाही पाण्यात पडला होता. त्याचा मृतदेह चार ते पाच दिवस सापडला नव्हता. काटेपूर्णा नदीवर लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित येणारा चाका सिंचन प्रकल्प आहे. पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीही वाढ होणार आहे. या पुलाचे काम करण्याची आवश्यकता असून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे असूनसुद्धा हे काम लघुसिंचन विभाग करेल, असा वाद आहे. तथापि, प्रशासनाने हा प्रश्न सामोपचाराने निकाली काढून पुलाची व पुलावरील रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
......................
१९८४ मध्ये वाहून गेला होता पूल
जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीवरील पूल यापूर्वी १९८४ मध्ये पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्यानंतर नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्याला आजमितीस ३७ वर्षे होत आहेत. सध्या पुलाची दयनीय अवस्था झाली असून पुलावरील रस्ताही नादुरूस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होण्यासोबतच अपघातांची शक्यताही बळावली आहे.
140721\screenshot_2021-07-14-17-19-25-003_com.whatsapp.jpg
पडलेलं वाहन