लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण नदीच्या काठावरील वाकी, वाघोळा या दोन गावांतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या नदीवरील पुलासह अडगावपर्यंतच्या रस्त्यासाठी ४.३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भुमीपुजन रविवारी आमदार राजेंद्र पाटणींच्या हस्ते करण्यात आले. कारंजा तालुक्यातील वाघोळा या पुनर्वसित गावात अपुºया शिक्षण सुविधांसह बाहेर गावात जाण्यासाठी मजबूत दळणवळण व्यवस्थेच्या अभावामुळे ५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करतात, तर ग्रामस्थांना या नदीच्या पुरामुळे पाच किलोमीटरचा फेºयाने वाकी येथे जावे लागत होते. त्यातच वाघोळा गावातील आबालवृद्धांना पावसाळ्याच्या दिवसांत नदीला पूर आल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागत होता. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना यासाठी जीवच धोक्यात घालून वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात. या संदर्भात लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल शासनाने घेतली आणि या ठिकाणी पुल व रस्त्यासाठी ४.३४ कोटींचा निधी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर केला. या कामाचे भुमीपुजन आमदार राजेंद्र पाटणींच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या गावांतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची समस्या दूर झाली आहे.
वाकी-वाघोळा दरम्यान अडाण नदीवर होणार पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:10 PM