लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांवर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे काम अतिशय संथ असून, पुलांच्या कामांसाठी वळणमार्गांवर केवळ मातीचा वापर झाल्याने मंगळवारी रात्री अवकाळी पावसानंतर चिखल तयार होऊन येथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. विविध ठिकाणी सुमारे दोन तास वाहनांची मोठी रांग उभीर होती. जिल्ह्यात पाच मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, याची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा अद्ययावत होणार असल्याने नागरिकांत समाधानाचेही वातावरण आहे; परंतु कामाची संथगती वाहनचालकांसह प्रवासीवर्गासाठी त्रासदायक ठरत आहे. मार्गाचे ेकाम करण्यापूर्वी पुलाची उभारणी आवश्यक असल्याने या मार्गावर विविध ठिकाणी येत असलेल्या नाल्यांवर पुलांची कामे करण्यात येत आहेत. यासाठी पूर्वीचे पूल खोदण्यात आले. अशात वाहतुक ठप्प होऊ नये म्हणून वळणमार्गही तयार करण्यात आले; परंतु हे वळणमार्ग करताना त्यावर केवळ माती आणि मुरमाचा वापर झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे या पुलांवर ठिकठिकाणी खोळंबा झाला. जवळपास दोन तास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या वळणामार्गावरील चिखलात वाहनाची चाके फसून अपघाताची होण्याची भिती असल्याने काही वाहनधारकांनी मार्ग बदलणेच पसंत केल्याचेही दिसले. येत्या दीड महिन्यात सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता पुलांची ही कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.
महामार्गांवरील पुलांचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 4:45 PM