शेतीचा वाद विकोपाला : आरोपी भावावर गुन्हा दाखलवाशिम : वडिलांनी दोन भावांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी करून दिली; परंतू त्यावर समाधान न मानता दिव्यांग असलेल्या भावाच्या हिस्स्यातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी आरोपी भावाविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.पंढरी रामभाऊ कड (वय ४५ वर्षे, रा. सावरगाव बर्डे, ता. वाशिम) यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझा लहान भाऊ पांडूरंग रामभाऊ कड हा बायका-पोरांसह घराशेजारीच वास्तव्याला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून तो शेती वाटपाच्या मुद्यावरून मला व वडिलांना शिविगाळ करून मारहाण करण्याच्या धमक्या द्यायचा. त्याला माझ्या हिस्स्यातून दोन गुंठे जमिन पाहिजे आहेत. मी व वडिलांनी त्याला अनेकवेळा समजावून सांगूनही तो त्याचा हट्ट सोडत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मी तीनचाकी सायकलने घरी निघालो असताना पांडूरंगने जवळ येऊन मारहाण करायला सुरूवात केली. न मारण्याची विनवणी करूनही त्याने ऐकले नाही; तर जवळच पडून असलेल्या काठीनेही मारहाण केली. यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर सायकलसकट उलटे पाडले. यावेळी माझा मुलगा आणि माझा दुसरा भाऊ विठ्ठल कड हे धावत घटनास्थळी आल्यामुळे माझा जीव बचावला. पंढरी रामभाऊ कड यांनी दाखल केलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी पांडूरंग रामभाऊ कड याच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धडधाकट इसमाने दिव्यांग भावाला केली मारहाण!
By admin | Published: July 17, 2017 1:50 PM