लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. दरम्यान, वीजच नसल्याने ‘लॅण्डलाईन’ सेवेसह ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवाही ठप्प झाल्याने बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रांमधील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.शिरपूर येथील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाकडे वीज वितरण कंपनीचे मागील काही महिन्यांपासून वीज देयक थकीत आहे. ते अदा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर १८ फेब्रूवारीला वीज पुरवठा खंडित केला. यामुळे मात्र गावातील बँक आॅफ महाराष्ट्र, जनता कमर्शियल बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रातील सेवा ठप्प झाल्याने नागरिकांसह अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाले. याकडे ‘बीएसएनएल’ने लक्ष पुरवून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळित करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यापासून ‘बीएसएनएल’ कार्यालयाचे वीज देयक अदा करणे तसेच जनरेटरमध्ये डिझल भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. देयक थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून सेवा सुरळित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बी. एस. अंभोरे उपविभागीय अधिकारी, ‘बीएसएनएल’, मालेगाव यापूर्वी ‘बीएसएनएल’च्या विस्कळित सेवेचा अनेकवेळा अडचणी सहन कराव्या लागला. आता तर ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित झाल्याने ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाली आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. धीरज कुमार शाखाधिकारी, बँक आॅफ महाराष्ट्र, शिरपूर मी नेहमीप्रमाणे सोमवारी बँकेमध्ये ‘आरटीजीएस’ करायला गेलो असता ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा खंडित असल्याने ते होऊ शकले नाही. यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.- प्रशांत क्षीररसागर,व्यावसायिक, शिरपूर जैन
‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित; ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाल्याने बँकींग व्यवहार कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 3:19 PM