लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - लोकार्पण होण्यापूर्वीच शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जेदारपणावर प्रश्नचिन्ह लागले आहे. खिडकीच्या काचा फुटल्या असून, भिंतीला तडे जाण्याबरोबरच स्लॅबमधूनही काही ठिकाणी गळती लागली असल्याचे दिसून येते.मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने सुरूवातीपासूनच दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. इमारत बांधकामासाठी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सन २०१२ मध्ये बांधकामाला सुरूवात झाली होती. सन २०१६-१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. निधीअभावी संरक्षण भिंतीचे काम रखडले होते. त्यानंतर निधी प्राप्त झाल्याने संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण झाले. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तथापि, अद्याप या इमारतीचे लोकार्पण झाले नाही. लोकार्पण होण्यापूर्वीच इमारतीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. खिडकीच्या काही काचा फुटल्या आहेत तसेच संरक्षण भींतही एका बाजूने झुकल्याचे दिसून येते. काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत तर स्लॅबमधून काही ठिकाणी पाणी गळती होते. इमारत परिसरात पेवर ब्लॉक बसविण्यात आले असून, पेवर ब्लॉकमधून ‘तणकट’ उगवले आहे. लोकार्पणापूर्वीच इमारतीची अशी दुरवस्था झाल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
लोकार्पणापूर्वीच शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 2:32 PM