लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. ग्रामपंचायत, भूमीअभिलेख विभाग, तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे येथे विविध धार्मिक उत्सवात येणाºया भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन माजी जि.प. सदस्य मो. इमदाद बागवान यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन सादर करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सुनावणी केली. यात शिरपूर येथील अतिक्रमण महिनाभरात हटवून शिरपूरचा विकास आराखडा तीन महिन्यांत तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तथापि, निर्धारित मुदतीत हे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी नोटीसही बजावली. त्यानंतर प्रशासनाने भूमीअभिलेख विभागाकाडून गावातील अतिक्रमणाचे मोजमाप करून घेण्यात आले; परंतु या प्रक्रियेचे शुल्क ग्रामपंचायतने न भरल्याने भूमीअभिलेख विभागाने मोजणी अहवाल दिला नाही. त्यामुळे कोणाचे नेमके किती अतिक्रमण आहे. हे कळायला ग्रामपंचायतकडे मार्गच नव्हता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम रखडली आणि लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ संभ्रमात पडले. अखेर ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून भूमीअभिलेख विभागाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. तो अहवाल गुरुवार ६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आणि शुक्रवार ७ सप्टेंबरपासून ग्रामपंचायतने महसूल, भूमीअभिलेख व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.
शिरपूरच्या पक्क्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात चालला 'गजराज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 3:20 PM
शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देया मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.