वाशिम : नगर परिषद प्रशासनाने शहरातील बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर मंगळवारी(दि.९) बुलडोझर चालवला. बहुतांश नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढल्याचे चित्र या भागात पहावयास मिळाले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा वाढला होता. परिणामी वाहतूक कोंडी होऊ लागली, रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले होते. प्रभारी मुख्याधिकारी मिन्नू पीएम पदभार स्विकारताच रस्त्याची पाहणी केली असता अनेक रस्त्यावर लघू व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. वाहतूक कोंडी समस्या दूर करण्यासाठी अतिक्रमण हटविण्याचा निर्णय नगरपरिषद अतिक्रमण विभागासह इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला.
त्यानुसार अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले होते. त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला. सोमवारी रात्री तर काहींनी मंगळवारी सकाळीच अतिक्रमण हटविले. स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढून घेतले नाही, असे दुकाने क्रेनच्या मदतीने हटविण्यात आली. १२ मे पर्यंत शहरात मोहीम चालणार असून विविध भागातील अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती नगर परिषदकडून देण्यात आली.