वाशिम: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना किन्हीराजा परिसरात २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यास वनविभागानेही दुजोरा दिल्यामुळे बिबट्याच्या सहवासाने किन्हीराजा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, जोगलदरी शेतशिवारात २१ नोव्हेंबरला अशोकराव नालिंदे यांचा बैल गहाळ झाला. रात्री उशिरापर्यंत शोध घेवूनही त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान, २२ नोव्हेंबरला सकाळी बैलाच्या शरिराचे अवशेष आढळले. त्यावरून शेतकरी नालिंदे यांनी वनविभागाकडे तक्रार दाखल केली. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. तथापि, किन्हीराजा परिसरातील धानोरा, जोगलदरी, मैराळडोह, किन्हीराजा-वाशिम रोड या भागात शेतकºयांना अनेकवेळा बिबट्या दिसून आला असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संभाजीराव घुगे, अशोकराव नालिंदे या शेतकºयांनी केली आहे.