वाशिम : जिल्ह्यातील शेलूबाजार येथे ७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील विविध ८ ठिकाणी कुलूपबंद घरे फोडून चोरीच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ज्यांच्या घरात चोरी झाले, त्यापैकी काही नागरिक बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनेतील नेमका किती ऐवज लंपास झाला, हे कळू शकले नाही.
महाशिवरात्रीनिमित्त काही भक्त चौरागडला महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यान ज्या घराला कुलूप दिसले त्याच घराची कुलूपे चोरट्यांनी तोडून हात साफ केले. गुप्ता चौकातील पुनम गुप्ता, मनोज गुप्ता, राजेश गुप्ता या तीन भावंडांच्या घरांची कुलूपे तोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. त्यातील एका भावाच्या मुलीचे लग्न असल्याने पुर्वतयारी म्हणून काही सोन्याचे दागिने व रोख रक्कम कपाटात ठेवून होती. तिघेही भाऊ बाहेरगावी असल्याने चोरीचा नेमका आकडा समोर आलेला नाही.
गुप्ता चौकातीलच अन्य दोन घरांची कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला; तर आस्था नगरीत देखील दोन घरे फोडल्या गेली. सोबतच साईनगरमध्ये कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला; मात्र तेथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. एका घरासमोरुन चोरून नेलेली दुचाकी अकोला रोडवरील बंद टोल नाक्याजवळ मिळाली. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडून तपासणीपोलिसांनी चोरी झालेल्या काही घरांच्या परिसरात श्वान पथकाद्वारे पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांकडूनही तपासणी करण्यात आली. आठ घटनांपैकी गुप्ता बांधवांच्या घरी झालेल्या चोरीत मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास करण्यात चोरट्यांना यश आले.