रिसोड : रिसोड तालुक्यातील कोयाळी भिसडे येथे घरफोडी करीत कपाटातील नऊ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.कोयाळी येथील ज्ञानबा शामराव भिसडे यांनी १८ डिसेंबर रोजी शेत व शेतमालाचे नऊ लाख रुपये घरातील कपाटात ठेवले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख नऊ लाख रुपये घेऊन पोबारा केला. सकाळी ६ वाजता घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे चोरी झाल्याचा संशय आला. कपाटाची पाहणी केली असता, नऊ लाख रुपये आढळून आले नाहीत. घराच्या मागच्या बाजूची खिडकी तुटलेल्या स्थितीत दिसून आली. याप्रकरणी ज्ञानबा भिसडे यांनी १९ डिसेंबर रोजी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.दरम्यान, ग्रामीण भागातही चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोयाळी येथे घरफोडी; ९ लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 6:34 PM
Crime News कपाटातील नऊ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
ठळक मुद्देशेतमालाचे नऊ लाख रुपये घरातील कपाटात ठेवले होते.चोरट्यांनी घराच्या मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला.कपाटातील रोख नऊ लाख रुपये घेऊन पोबारा केला.