अलीकडच्या काळात जिल्ह्यात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून, चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट, आमदार गल्ली येथे तीन घराला कुलूप पाहून चोरट्यांनी घरफोडी करीत दीड लाखांचा ऐवज लंपास केला. अल्लाडा प्लॉट येथे राहणारे तथा सैन्य दलात कार्यरत विलास सोपान वानखडे (५०) हे कुटुंबासह पुतणीच्या कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त स्थानिक नालंदा नगरातील भावाच्या घरी गेले होते. अल्लाडा प्लॉट येथील घराला कुलूप असल्याची संधी पाहून चोरट्यांनी रात्रीदरम्यान कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. रोख १८ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विलास वानखडे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. अल्लाडा प्लॉटमधीलच अन्य दोघांच्या घरांनाही कुलूप असल्याची संधी पाहून चोरट्यांनी जवळपास ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास वाशिम शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान, एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.