कार्ली : वाशिम तालुक्यातील कार्ली येथील सखुबाई गोविंदराव मार्गे यांच्या चार एकर शेतातील काढणीला आलेल्या गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत गहू जळून खाक झाल्याने महिला शेतकºयाचे नुकसान झाले.गट क्रमांक १६२ मधील चार एकर शेतातील गहू पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप सखुबाई मार्गे यांनी केला. कडाक्याचे ऊन, हवा आणि वाळलेला गहू यामुळे क्षणार्धात आग शेतात पसरली. गावातील युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चार एकरातील गहू जळून खाक झाला. विद्युत तारा लोंबकळलेल्या असून, यासंदर्भात महावितरणला वारंवार माहिती दिली. परंतू, याची दखल न घेतल्याने शेवटी या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन गव्हाचे नुकसान झाल्याचा आरोप महिला शेतकºयाने केला. घटनेची माहिती मिळताच तलाठी आकोश राठोड, कृषी सहाय्यक नितीन वाडेकर, ग्राम पंचायत सचिव राजु शेळके, महावितरणचे शाखा अभियंता अमोल नवरे, लाईनमन राहुल देशमुख, सरपंच गोविंदा पाटील, पोलीस पाटील प्रभाकर लाहे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मार्गे, यांच्यासह मान्यवरांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानभरपाई देण्याची मागणी सखुबाई मार्गे यांनी केली.
कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:37 PM