शिखरचंद बागरेचा / वाशिमदीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवार, २७ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला; मात्र या दिवशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या मानव विकास मिशनच्या बसेस अनेक गावांमध्ये पोहोचल्याच नाहीत. शाळेच्या दुसर्या दिवशीही हीच स्थिती कायम राहिल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पासेस प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यातील ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी राज्यशासनाने राज्य परिवहन महामंडळाला मानव मिशन बससेवा उपलब्ध करून दिली आहे. खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस २७ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल व्हायला हव्या होत्या; मात्र जिल्ह्यातील वाशिम आणि मंगरूळपीर आगाराने पहिल्याच दिवशी बसेस न सोडल्यामुळे शाळेसाठी तयार झालेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली.
पासेस प्रक्रियेत अडकल्या ‘मानव विकास’च्या बसेस!
By admin | Published: June 29, 2016 1:14 AM