एका कंत्राटदार कंपनीद्वारे या महामार्गाचे काम सुरू आहे. जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु अद्यापही लोणी फाट्यावर प्रवासी निवारा बांधला गेला नाही.
रिसोड तालुक्यातील लोणी गाव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या गावालगत लोणी खुर्द, शिवणी जाठ, सोनूना, गांधारी आदी गावे असून, या सर्व गावांतील लोकांना रिसोड तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी लोणी फाट्यावरून बस पकडावी लागते. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, पुरुष, युवक वर्ग, लहान बालके, या सर्वांना भर पावसातच येथे बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच महामार्गाचे काम करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली झाडेझुडपे तोडण्यात आली आहेत. आता प्रवाशांना आसरा घेण्यासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे काही प्रवाशांना सर्दी, ताप येऊन ते आजारी पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन, महामार्ग प्राधिकरणने लोणी बु. फाट्यावर तत्काळ प्रवासी निवारा बांधण्याच्या सूचना कंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी होत आहे.