लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे : नळजोडणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पुतण्याने काकाला मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १५ जूनच्या रात्री आरोपी पुतण्यासह इतर दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. वरदरी खुर्द येथील जयकुमार घुगे (वय ४५) यांनी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की घरात असताना कैलास घुगे यांनी आवाज दिल्यामुळे मी घराबाहेर आलो असता, ज्ञानेश्वर घुगे व सुनील घुगे हे घरासमोर नळजोडणी घेत होते. यावेळी ही जोडणी घराच्या थोडे बाजूला घे, असे म्हटल्यावरून वाद घालत माझा भाऊ कैलास व त्याच्या दोन मुलांनी जीवे मारण्याची धमकी देऊन सुनील घुगे याने तोंडावर व नाकावर बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी कैलास घुगे, सुनील घुगे, ज्ञानेश्वर घुगे या तीन आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास बीट जमादार विलास ताजणे, रन्नू रायलीवाले करीत आहेत.
पुतण्याची काकाला मारहाण
By admin | Published: June 17, 2017 12:58 AM