वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्जाचा अंतिम दिवस लक्षात घेता ३० डिसेंबर राेजी पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन स्वरुपात) उमेदवारी अर्ज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली.२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ३० डिसेंबर हा अंतिम दिवस आहे. उमेदवारी अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे दाखल करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना इंटरनेटची गती कमी होणे, सर्व्हर अडचण आदी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अर्ज दाखल करण्याचा कालावधी सुद्धा ३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत वाढविण्यात आला आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्वीकारणार
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गैरसोय होवू नये, यासाठी ३० डिसेंबर २०२० रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्जदारांची संख्या विचारात घेता, आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचे टेबल, खिडक्या वाढविण्यात याव्यात तसेच कार्यालय पूर्ण वेळ, आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत सुरु ठेवावे, अशा सूचना संबंधित विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
निवडणूक खर्चासाठी जुने बँक खाते वापरण्यास परवानगी
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास निवडणुकीत खर्च करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक, शेड्युल बँक याबरोबरच को-ऑप. बँकेत सुद्धा स्वतंत्र बँक खाते उघडण्यास तसेच या बँक खात्यामधूनच निवडणूक खर्च करण्यास २४ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये परवानगी देण्यात आली आहे. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ मार्च २०२० रोजी होणार होत्या. मात्र, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांनी उमदेवारी अर्ज भरतेवेळी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले असल्यास, त्याच खात्यातून खर्च करण्यास मुभा देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी विंचनकर यांनी सांगितले.