लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : अॅक्सीस बँक शाखा अकोला येथील कर्जाचा पूर्ण भरणा केल्यानंतरही ‘एनओसी’ (ना हरकत प्रमाणपत्र) मिळत नसल्याची तक्रार मांगूळ झनक येथील शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे. या तक्रारीमुळे अकोला शाखेतील दिरंगाई चव्हाट्यावर आली असून, बँकेचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी चौकशी करणार आहेत. मांगुळ झनक येथील अल्पभुधारक शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती असून, शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी अॅक्सिस बॅक शाखा अकोलामार्फत २०१६ मध्ये सोनालीका ट्रॅक्टर कर्जावर घेतले होते. पहिला हप्ता ८ मे २०१७ रोजी ८० हजार रुपये, दुसरा हप्ता १२ सप्टेंबर २०१७ रोजी ७६ हजार, तिसरा हप्ता १६ मार्च २०१८ रोजी ७२ हजार, चौथा हप्ता १४ सप्टेंबर २०१८ रोजी ६८ हजार, पाचवा हप्ता ८ माच २०१९ रोजी ६४ हजार व सहावा व शेवटचा हप्ता अकोला शाखेत जाउन १७ जुलै २०१९ रोजी ५७ हजाराचा भरणा करून कर्जाची परतफेड केली. याबाबतच्या पावत्याही नवघरे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिल्या. कर्जाचा संपूर्ण भरणा केल्यामुळे ट्रॅक्टरसंदर्भात आरसी व एनओसीची मागणी बँकेकडे केली असता तसेच १०-१२ वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप एनओसी मिळाली नाही तसेच यासंदर्भात समाधानकारक उत्तरही मिळत नाही, असे नवघरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सतीश नवघरे यांनी केली. सदर प्रकरण माझ्याकडे एका महिन्यापूर्वी आले आहे. स्वत: अकोला शाखेत जाऊन चौकशी करणार आहे. आजपर्यंत या बँकेने कोणावरही अन्याय केला नाही. या शेतकºयालाही न्याय मिळेल. तीन ते चार दिवसात सदर प्रकरण मार्गी लावले जाईल.- विजेश इटनकरवरिष्ठ अधिकारी, नागपूर अॅक्सिस बँक
कर्जाचा भरणा करूनही ‘एनओसी’ मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 4:00 PM