कारंजा लाड : बनावट दस्तावेज बनवून ती खरी असल्याचे दाखवित तालुक्यातील पोहा येथील वसंत विद्यालयामध्ये प्रयोगशाळा सहायक पदावर एका व्यक्तीची नियुक्ती करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामविकास मंडळ पोहाचे संचालक संजय सदाशिव दहातोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन शिक्षणाधिकार्यांसह आठ जणांविरुद्ध कारंजा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंडळ पोहाचे संचालक संजय सदाशिव दहातोंडे (६३) यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्हा परिषदेचे निलंबित माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, सन २0१२-१३ मध्ये कर्तव्यावर असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्वास लबडे, पोहा येथील वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक केशव तुळशीराम मराठे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनिष विलास राठोड, राजपाल बाबूसिंग राठोड, विश्वनाथ सीताराम धाडव आणि विजय राजपाल राठोड यांनी संगनमत करून ग्रामविकास मंडळ पोहाद्वारा संचालित वसंत विद्यालयात प्रयोगशाळा सहायक पदावर सचिन महादेव राऊत याची बेकायदेशीर नेमणूक करून त्यास मान्यता देत शासनाची फसवणूक केली. या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वांढरे करीत आहेत. दरम्यान, अशाच प्रकरणात मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव आणि वाशिम तालुक्यातील अनसिंग पोलिसातही खोटे दस्तऐवज तयार करून पदांची भरती केल्याबाबत निलंबित शिक्षणाधिकार्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, हे विशेष.
कारंजात दोन शिक्षणाधिका-यांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: January 07, 2015 1:03 AM