वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. त्यात कारंजा तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून, २३ व २४ या दाेन दिवसात कारंजा तालुक्यात १४० जण काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापाठाेपाठ वाशिम तालुक्यात संख्या वाढत आहे.
जिल्ह्यात १४ फेब्रुवारीपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. वाशिम जिल्ह्यात २३ व २४ फेब्रुवारी राेजी आढळून आलेल्या काेराेना बाधितांच्या संख्येमध्ये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आराेग्य विभागाच्या नाेंदीवरून दिसून येत आहे. यामध्ये २३ फेब्रुवारी राेजी जिल्ह्यात आढळून आलेल्या काेराेना पाॅझिटिव्हमध्ये कारंजा ८७, वाशिम १३, रिसाेड ३६, मालेगाव २, मंगरूळ १२, मानाराे ०, तर २४ फेब्रुवारी राेजी कारंजा ५३, वाशिम ३४, रिसाेड ४, मालेगाव ६, मंगरूळ ०, मानाराे ५ बाधितांचा समाेवश आहे. यामध्ये या दाेन दिवसात कारंजा तालुक्यात १४०, वाशिम तालुक्यात ७४, रिसाेड तालुक्यात ४०, मालेगाव तालुक्यात ८, मंगरूळपीर तालुक्यात १२, तर मानाेरा तालुक्यात ५ जणांचा समावेश आहे.
...............
देगावच्या शाळेने वाढविला रिसाेड तालुक्यातील काेराेना बाधितांचा आकडा
२२ व २३ फेब्रुवारी राेजी रिसाेड तालुक्यात आढळून आलेल्या ४० काेराेना बाधितांची संख्या २४ फेब्रुवारी राेजी देगाव येथील तब्बल १९० विद्यार्थी पाॅझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा माेठ्या प्रमाणात वाढला आहे. २४ फेब्रुवारी राेजी आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गत दाेन दिवसात या शाळेतील तब्बल २२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रिसाेड तालुक्यातील काेराेना बाधितांची संख्या पाहता तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. परंतु २४ फेब्रुवारीच्या अहवालावरून रिसाेड तालुका बाधितांमध्ये सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे.
..........
विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्ह्यात सर्वत्र कारवाई
जिल्ह्यात काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. वाशिम नगर परिषदेच्यावतीने आजपर्यंत शेकडाे दुकानदारांसह नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या पथकातील कनाेजे यांनी दिली. दरराेज शहरात फिरून दुकानदार, रस्त्यावरील मास्क नसलेल्या नागरिकांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे.