कारंजा तालुक्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने तसेच गृहविलगीकरणातील रूग्ण संचारबंदी नियमांचे पालन करीत नसल्याने सर्व बाधित रूग्णांवर तालुका स्तरावरील उपजिल्हा रूग्णालयात व तुळजाभवानी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणे सुरू आहे. अशातच १ एप्रिलला कामरगाव येथील एका जणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी कांरजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दहा दिवसाच्या आरोग्य विभागाच्या यशस्वी उपचारानंतर त्यांना १० एप्रिल रोजी सुट्टी देण्यात आली. परंतु बाधित रूग्णाला रूग्णवाहिकेने घरी पोहचविणे आवश्यक असतांना सदर रूग्णाला घरी जाण्यासाठी रूग्णवाहिका न पुरविता चक्क एस टी ने प्रवास करीत घरी पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेही त्या रूग्णाकडे तिकिटचे पैसे नसतांना १० एप्रिल रोजी घरी जा असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नसल्याने त्यांनी १० एप्रिलची रात्र दवाखान्यातच काढली. आणि ११ एप्रिलला सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उसणे घेउुन एस टी ने प्रवास करीत आपले घर गाठले. एस.टी.ने प्रवास करतांना सदर बाधित रूग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने इतरांना संसर्ग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:40 AM