मानोरा : मानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या धानोरा (घाडगे) येथे कपाशीच्या बोगस बीटी बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून, कृषी विभागाच्या चमूने १ मे रोजी धाड टाकली असता, ५ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संदीप दादाराव थेर यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एस. मकासरे यांच्या फ़िर्यादीनुसार, धानोरा बु.(घाडगे) येथे बोगस बीटी बियाणे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून घराची झड़ती घेतली असता, एकूण १० कट्टे आढळून आले. त्यापैकी ९ कट्टे सीलबंद व एक कट्टा खुला आढळून आला. त्यामध्ये ४९२ कापूस बियाणे पाकिटे असून, कल्याण १११ संशोधित असा उल्लेख आढळून आला. सदर एका पाकिटावर मूल्य १,२०० रुपये, तर त्याचे वजन ४५० ग्राम आढळून आले. एकूण ४९२ पाकिटे जप्त केली असून, याची किंमत ५ लाख ९० हजार ४०० रुपयांच्या घरात जाते. सदर बोगस बियाण्याची पाकिटे नंदूरबार येथून आरोपीने आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस स्टेशनला बोगस बियाणे ठेवून देण्यात आले. धाडसत्रादरम्यान आरोपी संदीप थेर फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध विनापरवाना बियाने साठवणे व विक्री करणे, तसेच ४२० सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई पंचायत समितीचे कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी के.डी. सोनटक्के, ठाणेदार शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मदन पुनेवार, महादेव पायघन, पार्वती लड़के, पोलीस पाटील अमोल हागे यांनी केली.