स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १ लाख ७२ हजारांवर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावांत परिस्थिती जैसे थे झाली. घरी शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हागणदारीमुक्त झालेल्या अनेक गावांत उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे २२ मार्चपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गुड मॉर्निंग पथकातर्फे गावोगावी भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज दिली जात आहे. गुरुवारी ग्रामीण भागात भेटी देण्यात आल्या. यावेळी अनेकजण उघड्यावर शौचास जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. काहींवर दंडात्मक कारवाई केली; तर काहींना समज देऊन सोडण्यात आले. ‘जागर शाश्वत स्वच्छतेचा’ या उपक्रमांतर्गत नागरिकांनी वैयक्तिक शौचालयाचाच वापर करावा, असे आवाहन स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी केले.
००००
बॉक्स...
पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची धास्ती
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषदेतही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अशा परिस्थितीतही गुड मॉर्निंग पथकातील सदस्य हे ग्रामीण भागात फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज देत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने एखाद्यापासून आपल्यालाही कोरोना विषाणूचा संसर्ग तर होणार नाही ना? अशी भीती कर्मचाऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.