लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्षयरोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टिकोनातून संशयित क्षयरुग्ण तपासणी मोहिम सुरू असून, जिल्ह्यापासून कोसोदूर असलेल्या संशयित रूग्णांची तपासणी सीबीनॅट मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जात आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यापासून दूर अंतरावर असलेल्या कारंजा, मानोरा तालुक्याची निवड करण्यात आली.प्रत्येक संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १२ सुक्ष्मदर्शी केंद्राची सुविधा उपलब्ध केली असून, आता अत्याधुनिक अशी सीबीनॅट मोबाईल व्हॅन उपलब्ध झाली आहे. जिल्हा क्षयरोग केंद्र येथे संशयित रुग्णांची सीबीनॅट मशिनद्वारे थुंकी नमुने घेऊन तपासले जातात. तथापि, जिल्ह्यापासून कोसो दूर अंतरावर असलेल्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी रुग्णांना वाशिम येथे बोलाविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. काही संशयित रुग्ण वाशिम येथे तपासणी करण्यासाठी येण्यास टाळाटाळही करीत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्याला सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध झाली असून, सीबीनॅट मोबाईल व्हॅनद्वारे थुंकी नमुना तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मानोरा व कारंजा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर यांच्या नियोजनानुसार १९ संशयित रुग्णांची ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून, उपचार सुरू करण्यात आले. डॉ. सागर जाधव, डॉ. शंकर नांदे, डॉ. डोईफोडे, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र देवलकर यांच्यासह अब्दुल रहीम, पाटील, पिंपरकर, भगत आदींनी तपासणी केली.
संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 4:07 PM
जिल्ह्यापासून कोसोदूर असलेल्या संशयित रूग्णांची तपासणी सीबीनॅट मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जात आहे.
ठळक मुद्देप्रत्येक संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १२ सुक्ष्मदर्शी केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. सीबीनॅट मोबाईल व्हॅनद्वारे थुंकी नमुना तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.