देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने अक्षरश: हाहा:कार माजविला आहे. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मतेचा प्रत्यय देत रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा केला. रमजान महिन्यातील ३० रोजे (उपवास) संपल्यानंतर गुरूवारी चंद्रदर्शन झाले; तर शुक्रवारी ईद-उल-फित्र साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचे पालन करत मुस्लिम बांधवांनी घरीच नमाजचे पठण केले.
................
फेसबुक, व्हाटसअॅपवर दिल्या एकमेकांना शुभेच्छा
रमजान ईदच्या दिवशी ईदगाहवर एकत्र जमून नमाजचे पठण केले जाते. त्यानंतर गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात; मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा हा प्रकार प्रकर्षाने टाळण्यात आला. जिल्ह्यातील कुठल्याच ईदगाह मैदानावर सार्वजनिकरित्या नमाजचे पठण करण्यात आले नाही. मुस्लिम समाजबांधवांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून संदेश टाकत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.