वाशिम, दि. 16- बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग घेतला होता. बंजारा समाजातील पारंपारिक गीतांवर महिलांनी यावेळी नृत्य सादर केले.
प्राचीन पंरपरेपासून बंजारा समाजात तीज उत्सवाचे आयोजन केलं जातं. पूर्वी काळी ‘लदेनी’ (मिठाचा तसेच तर व्यापार) करीत असतांना सर्व बंजारा समाज बांधव पावसाळयात एकत्र यायचे. ज्या मुली लग्न होवून सासरला जातात त्यांच्यासाठी हा नऊ दिवसाचा खास उत्सव असतो. नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे करुन शेवटच्या दिवशी या तीज उत्सवाचे विसर्जन केलं जाते. नवव्या दिवशी ‘मोळया’ (राधाकृष्णाच्या मुर्तीचे पूजन व जेवणाचा कार्यक्रम) करुन मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत पारंपारिक नृत्यावर महिला नृत्य करतात. १५ ऑगस्ट रोजी ६.०० वाजता शहरातून तीज उत्सव सांगता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तांडा नायक यांच्यासह शेकडो बंजारा महिला पुरुषांची उपस्थिती लाभली होती. यावेळी बंजारा समाजातील युवतींनी पारंपारिक गीतावर नृत्य करुन आम्ही नऊ दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ मैत्रिणीप्रमाणे , सखीप्रमाणे साथ दिली. असे बंजारा गीतामध्ये या महिलांनी म्हंटलं.