यावर्षी योगायोगाने रमजान ईद आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती १४ मे रोजी एकाच दिवशी आली. दरम्यान, मुस्लीमबांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या एकत्र जमून ईदचा सण साजरा न करता घरातच नमाजचे पठण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाकडून वारंवार करण्यात आले. समाजातील माैलाना, माैलवी व प्रतिष्ठित नागरिकांनीही समाजबांधवांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरव्ही जल्लोषात साजरी होणारी रमजान ईद यावर्षी प्रथमच साधेपणाने साजरी करून मुस्लीम समाजबांधवांनी एकमेकांचे हित जोपासले.
दुसरीकडे हिंदू समाजबांधवांनीही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सार्वजनिकरीत्या साजरी न करता घरोघरी उत्साहात साजरी केली. संभाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येकाने घरातच प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.