वाशिम : सिमेंट, स्टील या कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलाचे बांधकाम करत असलेले लाभार्थी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने हे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
राज्यात कोविडचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. ग्रामीण घरकुलांचे निर्माण कार्य सुरू असताना या संधीचा फायदा घेण्यासाठी सिमेंट आणि स्टील कंपन्या तसेच व्यावसायिकांनी दर वाढविले आहेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. अचानक मोठ्या प्रमाणात सिमेंट व स्टीलचे दर वधारले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून कच्च्या मालात होत असलेली भाववाढ नियंत्रित करावी, अशी मागणी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकाम करत असलेल्या लाभार्थ्यांनी केली आहे. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षांपासून बांधकाम उद्योगासह इतर उद्योगही बाधित झाले आहेत.
कोरोनापूर्व काळातच बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. कोरोना काळात त्यात अधिक भर पडली. मात्र आता अचानक कच्च्या मालातील भाववाढीमुळे घरकुल लाभार्थी हवालदिल झाले आहेत. घरकुलाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने व्यावसायिक दिवसेंदिवस दरवाढ करून कोरोना संसर्ग व संचारबंदीचा लाभ घेत आहेत, असा आरोप होत आहे. कच्च्या मालाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य सरकारकडे सबळ पाठपुरावा करावा, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.
दरम्यान आता संचारबंदीत हार्डवेअरचे दुकानही बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे घरपोच सेवा हवी असेल तर जादा दर द्यावे लागतील, असेही काही व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे.
००
कोविडमुळे बांधकाम क्षेत्र झाले प्रभावित
नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. बांधकाम क्षेत्रावर असंख्य नागरिकांची रोजीरोटी चालत असते. अनेक उद्योग त्यावर अवलंबून आहेत. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. असे असताना सरकार बांधकाम क्षेत्राला पुरेसा पाठिंबा देत नसल्याची भावना बांधकाम क्षेत्राची झाली आहे. सरकारने तातडीने पावले उचलत स्टील आणि सिमेंटचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग वाढल्याने घरकुलाची कामे प्रभावित होत आहेत. गत आठवड्यापासून संचारबंदीचा सुधारीत आदेश आल्याने घरकुल बांधकामे प्रभावित होत आहेत.