वाशिम - मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही. कारवाईचा प्रस्ताव गुलदस्त्यात असल्याने निवडणूक विभाग काय पाऊल उचलणार, याकडे लक्ष लागून आहे.जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार पुनर्रीक्षण यादीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. खासगी शाळेचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच नगर परिषदेचे शिक्षक आदींवर केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांची (बीएलओ) जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीच्या कामात काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामचुकारपणा करीत असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना घरोघरी भेटी देवून मतदारांसंबंधी माहिती गोळा करावयाची आहे. गोळा केलेली माहिती बी.एल.ओ. हायब्रीड अॅपमध्ये भरणे अनिवार्य आहे. वाशिम तालुक्यात जवळपास २० बीएलओ यांनी कामकाजात दिरंगाई केल्याचे जुलै महिन्यातच आढळून आले होते. सोपविलेली कामे व्यवस्थित पार न पाडणे, आढावा सभेस उपस्थित न राहणे, दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही प्रतिसाद न देणे, निवडणुकीसारख्या अति महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे आदी प्रकरणी या २० बीएलओंवर ठपका ठेवण्यात आला होता. निवडणुकीच्या कामकाजात दिरंगाई करणाºया २० ‘बीएलओ’विरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात वाशिम तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. पावणे दोन महिन्याचा कालावधी उलटत असतानाही, अद्याप कामचुकार बीएलओंविरूद्ध कोणतीच कार्यवाही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक विभागाने शिक्षण विभागाला दोन दिवसांपूर्वी स्मरणपत्र देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागितल्याने आता शिक्षण विभाग कामाला लागला असल्याचे दिसून येते.
केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांविरुद्धची कारवाई गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:12 PM