संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दहावीच्या निकालानंतर आता अकरावीतील प्रवेशांचे वेध लागले असून, यावषीर्ही केंद्रीय प्रवेश पद्धतीला फाटा देत कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागांची संख्या दीड पटीने जास्त असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला.इयत्ता दहावीचा निकाल ८ जून रोजी आॅनलाईन घोषित झाला. निकालानंतर साधारणत: ८ दिवसात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणे अपेक्षीत आहे. त्यानंतर अकरावीतील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तुर्तास अकरावीतील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित नसले तरी झच्छित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थी, पालकांची धडपड सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचा हा हंगाम 'कॅश' करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनीदेखील कंबर कसली असून त्यात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्याने संस्थाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली तर प्रवेशपत्र विक्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबेल तसेच डोनेशनच्या प्रकारालाही चाप बसू शकतो. नजीकच्या अकोला जिल्हयात केंद्रीय पद्धतीने अकरावीतील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र केंद्रीय पद्धतीऐवजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याने भुर्दंड बसण्याची शक्यता विद्यार्थी, पालकांमधून वर्तविली जात आहे. डोनेशनच्या नावाखाली अनुदानित, विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम वसुल करता येत नाही. शहरासह ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांकडून डोनेशनच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होणार नाही, याची दक्षता शिक्षण विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे. १५ हजार उत्तीर्ण विद्यार्थी, २२ हजार जागा !यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्यातही काही विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, तंत्रनिकेतन, औषध शास्त्र पदविका, कृषी पदविका आदी अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी गोंधळ उडणार नाही, असा दावा शिक्षण विभागातर्फे केला जात आहे. काही विशिष्ट महाविद्यालयांना सर्वाधिक पसंती असल्याने तेथे विद्यार्थ्यांची एकच गर्दी होऊ शकते. जिल्ह्यात अकरावी विज्ञान शाखेच्या ९ हजार ४४० जागा आहे. वाणिज्य शाखेच्या ६४० जागा, संयुक्त अशा ८०० जागा तर कला शाखेच्या सर्वाधिक १० हजार ८८० जागा आहेत 'एसीबी'कडे करता येते तक्रार !- अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे डोनेशनची मागणी करता येत नाही. प्रवेशासाठी कुणी डोनेशनची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) वाशिम येथे तक्रार नोंदविता येते. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीअंती डोनेशनची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाते.- जिल्ह्यात कैद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे जि.प.सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी म्हटले.