लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शारिरीक क्षमता कायम टिकविण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पौष्टीक तृणधान्य दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम कृषी विज्ञान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास डॉ. आर.एल. काळे, डॉ. विकास गौड, शुभांगी वाटाणे, तुषार देशमुख, डी.के.चौधरी, कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गावसाने म्हणाले, की सद्या नागरिकांच्या आहार पद्धतीत बहुतांशी बदल झाला असून तृणधान्याऐवजी अन्य खाद्यपदार्थांचाच वापर अधिक वाढला आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी तृणधान्याचा वापर मात्र फारच कमी प्रमाणात होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेवून आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इतर मान्यवरांनीही याप्रसंगी तृणधान्याचे महत्व विषद केले.
आरोग्याच्या समतोलासाठी आहारात तृणधान्य अत्यावश्यक - दत्तात्रय गावसाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 2:33 PM