सुनील काकडे, वाशिम: विविध स्वरूपातील प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी येथील एसटी आगारात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गुरूवार, १५ जूनपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेस संघटनेच्या पुढाकारात सुरू झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून चालक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ मागील पाच वर्षांपासून प्रलंबित आहे, ती विनाविलंब लागू करण्यात यावी. वार्षिक शिल्लक असलेल्या ३०० पेक्षा अधिक रजांची रक्कम मिळायला हवी; मात्र त्याकडे संबंधितांनी डोळेझाक केली. परिणामी, कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असून शिल्लक रजांची माहिती आणि रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी. यासह परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीपासून वंचित राहावे लागत आहे. अनुकंपाधारक पाल्ल्यांनाही नोकरी मिळणे कठीण झाले असून हे प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावे, आदी मागण्या पुढे रेटण्यात आल्या आहेत.
साखळी उपोषण आंदोलनाच्या पहिल्या दिवशी चालक डी.आ. काकडे, पी.ए. तोडकर, आर.एस. सरदार आणि आर.आर. पंचभाई यांनी सहभाग नोंदविला. उपोषणस्थळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली.