सुनील काकडे, वाशिम : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनलने १८ पैकी १७ जागांवर एकहाती विजय मिळविला. २० मे रोजी पार पडलेली सभापती, उपसभापती निवडणूक त्यामुळे अविरोध होऊन वाशिम जि.प.चे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची सभापतीपदी; तर बबलू उर्फ राजकुमार गावंडे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी सहकार पॅनलने १८ पैकी १७ जागांवर एकतर्फी विजय मिळविला होता. त्यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गावंडे, वसंतराव पाटील, गुणवंतराव पाकधने, आत्माराम पाटील, जिनींग प्रेसिंगचे अध्यक्ष सतीश बाहेती, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शालिग्राम राऊत, सर्व संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नेते व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात सत्कार करण्यात आला.