मालेगाव : शहरातील मतदार यादीत बोगस मतदारांची नावे समोर येत असून बोगस मतदार शोधून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.मालेगाव ग्रामपंचायला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली. पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदार यादीत संक्षित पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. काही मतदार हे शहरात वास्तव्याला नसतानादेखील नावे आहेत तसेच मतदान करतात, हे समोर येत आहे. अनेक मतदार २० ते २५ वर्षांपासून शहरात वास्तव्यास नाहीत. अनेक मतदार हे मयत आहेत तर काहींची नावे एकाच मतदान यादीत दोन वेळा किंवा अनेक वार्डात तेच नावे पुन्हा आहेत तर काही ग्रामीण भागातील लोकांनी मालेगाव शहर आणि ग्रामीण भागात असे दोन्हीकडे नावे आहेत. ३ फेब्रुवारी २०२० व ११ नोव्हेंबर २०२० रोजी काही जणांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे तक्रारवजा निवेदन देण्यात आले असून बोगस मतदार यादीतून ही नावे वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे. बोगस मतदान करून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार हा प्रकार चालवित असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मालेगाव शहरात अनेक बोगस मतदार आहेत. प्रशासनाने दिलेल्या पत्त्यावर अनेक व्यक्ती राहत नाहीत. काही नावे ग्रामीण भागात आणि मालेगाव शहरात असे दोन्हीकडे आहेत. ती वगळण्यात यावी, याबाबत लवकरच पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल. वेळप्रसंगी न्यायालयातसुद्धा आम्ही जाणार आहोत.- सय्यद अय्युब,नागरिक, मालेगाव