गेल्या २५ वर्षांपासून आषाढी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरची वारी करतो आहे. या काळात दहा दिवस पंढरपुरात राहतो. गतवर्षीपासून कोरोनामुळे वारीवर मर्यादा लागल्या आहेत. पंढरपूरच्या वारीचा अवर्णनीय सोहळा पाहण्यासाठी जीव आतुर असतो. त्यामुळे घरी मन लागत नाही. पंढरपुरात चंद्रभागेचे स्नान, वाळवंटातील हरी कीर्तने, गोपाळपुरीवरचा हरी सोहळा डोळ्यात सतत सतत साठवावा वाटतो. वाळवंटातील पुंडलिकाचे दर्शन, असंख्य दिंड्यांचा पंढरपूरला वेढा, हा मंगलमय भक्तिसागर सोहळा पाहण्यासाठी जीवाला बेचैनी असते. या वर्षीही कोरोनामुळे पंढरपूरला जाता येत नसल्याचं शल्य आहे.
भानुदास पाटील उपाध्ये, वारकरी काजळेश्वर
------------
पांडुरंगाच्या वारीसाठी जीव आतुर आहे.
माउलीच्या रथाबरोबर आळंदी ते पंढरपूर पायदळ वारीचा आनंद काही वेगळाच आहे. ज्ञानबा, तुकोबाचा गजर आणि नाचत-गात पांडुरंगाचे गुणगाण करीत पंढरपूरची पायदळ वारीत मार्गक्रमण करताना ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. आषाढीची पायदळ वारी केल्याने पंढरपूरची ओढ वाटते, परंतु कोरोनामुळे आमच्या वारीवर गतवर्षीपासून निर्बंध लावण्यात आले आहेत. यंदाही हे निर्बंध कायम असल्याने वारी करता येणार नाही. याचे अतिव दु:ख आहे, परंतु विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कमी झालेली नाही. ही महामारी संपेल, पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाचा, वारीचा योग येईल, असा पांडुरंगामुळेच विश्वास वाटतो. पांडुरंग हे संकट निश्चितच दूर करेल.
-शिवा उपाध्ये, वारकरी, काजळेश्वर
---------------
माझे मन पंढरीतच आहे.
आषाढी पंढरपूरची वारी नित्य नियमाने चालू आहे. गतवर्षीपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाचे निर्बंध असल्याने पंढरपूरच्या वारीत खंड पडला. यंदाही निर्बंध कायम असल्याने पंढरपूरला जाता येत नसून, आषाढी वारीनिमित्त जीवाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. जीवाला हुरहूर वाटते. ‘विठ्ठला भेटी लागे जीवा लागलीसे आसं’ या ओळीनुसार शरीराने जरी घरी असलो तरी मन मात्र पंढरपुरात आहे.
-डिगांबर पाटील उपाध्ये, वारकरी, काजळेश्वर ता.कारंजा.