लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १० दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने जिल्ह्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. विशेषत: लहाने बालके मोठ्या संख्येने आजारी पडत असून, उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत.गत १० दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पाऊस, ऊन, सावलीचा खेळ सुरू आहे. या खेळात बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. या विषाणूजन्य तापासोबत लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज २५० ते ३०० नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. २९ आॅक्टोबर रोजी भाऊबीज असतानाही सरकारी दवाखान्यात अनेक रु्ग्ण उपचारार्थ दाखल झाले होते. खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना शक्यतोवर सहन होत नाहीत. लहान बालकांना सर्दी, ताप व खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागले. वातावरणातील या बदलांशी बालक व वृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने साहजिकच आरोग्य बिघडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. खासगी दवाखान्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी व तुरळक प्रमाणात विषमज्वर आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे विशेषत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापेची लक्षणे आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. अनिल कावरखे,वैद्यकीय अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम
वातावरणात बदल; साथरोगाने जिल्हा फणफणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 1:55 PM