मानोरा : मानोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसमावेशक आघाडीने १८ पैकी १७ जागा पटकावून सत्ता परिवर्तन केले, तर मागील १३ वर्षां पासून अधिराज्य गाजविणारे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि माजी आमदार अनं तकुमार पाटील यांच्या शेतकरी पॅनलला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. मानोरा तालुक्यात ग्रामपंचायती, जिनिंग-प्रेसिंग, बाजार समिती, खवि संघ आदी निवडणुका पार पडल्या. यात स्व.भीमराव पाटील सहकारी जिनींग, जि.मध्य.सह. बँक आदी सहकार क्षेत्रातील संस्था ठाकरे व पाटील, चव्हाण गटाने काबीज केल्या. त्याच विजयाच्या जोरावर १३ वर्षांपासून ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी मागील महिन्याभरापासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या मतमोजणीत मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे, पाटील, भोजराज चव्हाण गटाच्या १७ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. यात माजी आमदार अनंतकुमार पाटील यांचे चिरंजीव विजय पाटील, भोजराज चव्हाण यांचे चिरंजीव विक्रम चव्हाण, माजी सभापती प्रेमसिंग राठोड, माजी उपसभापती नीळकंठ पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला. या विजयासाठी सहकार नेते सुरेश गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, भाजपचे नेते महादेवराव ठाकरे, केशवराव नाईक, शेषराव नाईक, नीळकंठ पाटील, भाऊ नाईक, अशोकराव देशमुख, दुधराम पवार, डॉ.राठोड, अरविंद राऊत, इफ्तेखार पटेल, सुरेंद्र देशमुख, राजु नेमाने, प्रकाश राठोड, अभय राठोड, अशोक चव्हाण, मधुसूदन राठोड यांनी बाजू लढविली होती.
मानोरा बाजार समितीत परिवर्तन
By admin | Published: September 01, 2015 1:44 AM