वाशिम: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्तधान्य दुकानांतून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाºया मासिक नियतनात बदल करण्यात आला असून, तांदुळाचे वाटप एक किलोने कमी करून, गव्हाचे प्रमाण १ किलोने वाढविण्यात आले आहे. तांदळाचा पुरवठा कमी असल्याने धान्य वितरणाचे सरासरी प्रमाण राखण्यासाठी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून ७०० पेक्षा अधिक स्वस्तधान्य दुकाने आहेत. या सर्व दुकांनातून पिवळ्या, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांना ठरलेल्या मानसी प्रमाणानुसार धान्य वितरण करण्यात येते. यामध्ये केशरी शिधापत्रिकावरं मानसी २ किलो तांदुळ आणि ३ किलो गहू, स्वस्तदराने वितरित करण्याचे निश्चित झालेले आहे. त्याच प्रमाणानुसार गत महिन्यापर्यंत पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यातही येत होते. तथापि, सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत तांदळाचा पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे शिधापत्रिकांवरील धान्याच्या वितरणाच्या प्रमाणातही बदल करण्यात आलेला आहे. बदल झालेल्या प्रमाणानुसार केशरी शिधापत्रिकांवर तांदळाचे मानसी दोन किलोचे प्रमाण एक किलो करण्यात आले, तर गव्हाचे मानसी तीन किलोचे प्रमाण वाढवून चार किलो करण्यात आले आहे. असे असले तरी, एकू ण धान्य वितरणाचे प्रमाण आणि धान्याच्या दरात मात्र कसलाही बदल करण्यात आलेला नाही. तांदळाचा पुरवठा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी, काही शिधापत्रिकाधारकांची मात्र त्यामुळे पंचायत झाली आहे.