वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.पश्चिम वºहाडात यंदा जवळपास १ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. यात बुलडाणा ७८ हजार १६१ हेक्टर, अकोला ४७ हजार ३४१ हेक्टर, तर वाशिम ५९ हजार ७८० हेक्टर, असे तुरीच्या पेरणीचे क्षेत्र आहे. जून महिन्यातील दमदार पावसानंतर बहरलेल्या तुरीला मध्यंतरी जुलै महिन्यात पावसाने खंड दिल्याने थोडा फटका बसून वाढ खुंटली; परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस आल्याने या पिकाला चांगलाच आधार मिळाला. आता तुरीचे पीक फुलावर असताना हिवाळ्याच्या सुरुवातीला वातावरणात विषम स्वरुपाचा बदल पाहायला मिळत आहे. दिवसाला तापमानात प्रचंड वाढ होत आहे, तर रात्री थंडी पडत असल्याने तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होऊन या पिकाचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे. प्रत्यक्षात थंडीचा फायदा या पिकाला होतो; परंतु दिवसा सतत वाढत असलेल्या तापमानामुळे हा प्रकार होत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत दिवसा तापमान प्रचंड वाढत असल्याने आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या तुरीची झाडे सुकत आहेत. रात्रीच्या थंडीचा फायदाही पिकाला होत नसून, विषम वातावरणामुळे फुले गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.-प्रितम भगतशेतकरी, चांभई (मंगरुळपीर)