कारंजा लाड (वाशिम) - एम.डी.ची बनावट पदव्यूत्तर पदवी वापरून कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांनी रूग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी ७ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल होताच, अटक होण्याच्या भितीने डॉ. सारडा फरार झाले. दरम्यान, फरार डॉक्टरच्या शोधार्थ कारंजा पोलिसाचे पथक रवाना झाले आहे.
कारंजा येथील लक्झरी बस स्थानकावर मागील काही काळापासून बालरोग तज्ज्ञ डॉ. सारडा यांचे प्रशस्त असे विठ्ठल हॉस्पीटल आहे. गत १४ वर्षांपासून एम.डी.पदव्यूत्तर पदवीअंतर्गत बाल रूग्णांची तपासणी करतात. त्यांच्या एम.डी. पदव्यूत्तर पदवी संदर्भात संशय आल्याने कारंजा येथील किरण रामभाउ क्षार व डॉ. मनोज काळे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविली होती. माहिती प्राप्त झाल्यानुसार, ५ डिसेंबर २०१७ रोजी कारंजा शहर पोलिसात बनावट एम.डी.पदव्यूत्तर पदवीसंदर्भात क्षार व डॉ. काळे यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात कारंजा शहर पोलिसांनी ५ डिसेंबर २०१७ ते ७ मार्च २०१८ पर्यंत सविस्तर चौकशी केली. सर्व प्रमाणपत्र, पदवी, पदव्यूत्तर पदवीची पडताळणी केली. चौकशी व तपासाअंती व संबंधित विभागाकडून प्राप्त अहवालावरून ७ मार्चला रात्री १०.३० वाजतादरम्यान डॉ. नवल सारडा यांच्याविरूद्ध भादंवीच्या कलम ४२०, १९८, ४६५, ४६८, ४७१, ३३, ३७, १५ व १५,३ सह कलम ३६ व ३८ महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर अॅक्ट १९६१ सह कलम २६ इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ चे उल्लंघन सह कलम १,४,२ नुसार गुन्हे दाखल होताच, डॉ. सारडा फरार झाले. या प्रकरणी पोलीस व तक्रारदार यांच्यावर राजकीय दबाव असल्याने गुन्हे दाखल होण्यास विलंब झाला असल्याचे बोलले जात आहे. फरार डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी कारंजा शहर पोलिसांनी पथक रवाना केले आहे. पुढील तपास ठाणेदार एम.एम.बोडखे यांच्या मागदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व सहकारी करीत आहेत. कारंजा शहर पोलीस प्रशासनाकडून फरार डॉक्टरला अटक होईल काय, याकडे कारंजावासियांचे लक्ष लागून आहे.