लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ४१ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण स्थानिक पंचायत समिती सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील वयाच्या १८ ते ६० वर्षे आतील कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यु झाल्यास अशा कुटुंब प्रमुखाच्या विधवा पत्नीस २० हजाराचा लाभ देण्यात येतो. या आर्थिक वर्षात ४१ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यां च्यासह तहसीलदार भोसले, गटविकास अधिकारी तापी, तालुका कृषी अधिकारी वाळके, संजय गांधी निराधार समिती सदस्य अरूण पाटील अघम उपस्थित होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर त्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असते. परंतु नियतीच्या आड एखादी अनुचित घटना घडून अशा कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास, शासन अर्थसहाय्य योजनेंतर्गत मदत करते. अर्थसहाय्य योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील एकूण ४१ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश आमदार पाटणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, संबंधित अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक व लाभार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४१ लाभार्थींना धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 6:33 PM