यावर्षी सोयाबीन बियाणांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. यानुषंगाने उंबर्डा बाजार येथे मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक सभा घेण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी सोयाबीन पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी सांगितलेल्या पेरणीविषयक अष्टसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक सचिन उदयकार यांनी ओल्या गोणपाटावर १०० सोयाबीन बियाणाचे दाणे टाकून उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर बी.बी.एफ. पद्धतीने पेरणी करण्याचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. घरचेच सोयाबीन बियाणे पेरणीकरिता वापरण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी सहायक मालखेडे यांनी पेरणी करताना सोयाबीन ३ ते ५ सें.मी. खोलीवर अशा पद्धतीने पेरणी करावी, असे सांगितले. बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक कार्यक्रमास राजू घोडे, ओंकार घोडे, आशिष पांगसे, विजय घोडे आदी शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन, आभार प्रदर्शन यशवंत रनमाळे यांनी केले.
पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:41 AM