वाशिम : खरीप हंगामासाठी घरचे बियाणे पेरण्यासह त्याची उगवण क्षमता तपासणेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी शुक्रवारी केले.
वाशिम तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बियाणाची उगवण शक्ती तपासणीकरिता एक गोणपाठ घेऊन त्यावरती शंभर बिया एका ओळीत दहा याप्रमाणे दहा रेषेवरील ठरावीक अंतरावर ठेवण्यात आल्या. या पद्धतीनुसार बियाणे उगवण क्षमता कशी तपासावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. गोणपाठावरती पाणी शिंपडून त्याची गोल गुंडाळी करावी. दोन दिवसाकरिता सावलीत दर दोन तासाने आवश्यकतेनुसार पाण्याचा शिडकावा मारून थंड जागेत सावलीतच ठेवावी. चोवीस तासानंतर जेवढ्या बियांना अंकुर आले, ती संख्या सदर बियाणाची उगवणशक्ती टक्केवारी समजावी. ८५ - ९० टक्केच्या वर जर बियाणाची उगवण क्षमता असेल तर सदर घरचे बियाणे पुढील खरीप हंगामात येण्यास सुरक्षित आहे असे समजावे. हा प्रयोग शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले आहे. तसेच यावर्षी बीजप्रक्रिया केल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये. गेल्यावर्षी बीजप्रक्रिया केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले असल्याने जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात वर्षीसुद्धा बीजप्रक्रिया राबविण्यात येत आहे.