लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर १७ कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा गौडबंगाल झाल्याच्या तक्रारी होत आहेत. ८ आॅगस्टची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि त्यानंतर १४ आॅगस्टच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय चर्चिल्या गेला. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही केवळ संबंधित यंत्रणेच्या चुकांमुळे वाशिम जिल्ह्यात ही योजना वांध्यात सापडली असून कामेही रखडली आहेत.प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १७ ठिकाणच्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. असे असताना कार्यकारी अभियंत्यांनी १७ कामांची विभागणी १३ मोठ्या निविदांमध्ये मर्जीतील तथा असक्षम कंत्राटदारांच्या निविदा मंजूर केल्या. अशा चुकीच्या पद्धतीने छोट्या कंत्राटदारांना कामेच मिळू नये, अशी व्यवस्था निर्माण केली. याशिवाय झालेली कामे देखील बोगस असल्याने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी लावण्याची मागणी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी ८ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात १४ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय ऐरणीवर आला. याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून उच्चस्तरीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी लावून धरली. त्यावर विद्यमान पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे मान्य केले. यावरून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निविदा प्रक्रिया व रस्त्यांची कामे देखील सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सापडली वांध्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:05 PM
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही केवळ संबंधित यंत्रणेच्या चुकांमुळे वाशिम जिल्ह्यात ही योजना वांध्यात सापडली असून कामेही रखडली आहेत.
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १७ ठिकाणच्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निविदा प्रक्रिया व रस्त्यांची कामे देखील सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे.