वाशिम : काेराेना नियमांचे काटेकाेर पालन व्हावे, यामध्ये काेणत्याच प्रकारची दिरंगाई हाेणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील नगरपालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार खुद्द वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे रस्त्यावर उतरून लघुव्यावसायिकांसह दुकानदारांना भेटून त्यांना काेराेना नियमांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन केले.
वाशिम शहरात काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व नगरपालिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्याने वाशिम मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्यासह नगर परिषदेमधील अधिकारी, कर्मचारी यांनी शहरातील भाजी व्यावसायिक, लघुव्यावसायिकांसह शहरातील दुकानांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी काेराेना नियमासंदर्भात सर्वांना माहिती दिली. या नियमांचे उल्लंघन हाेणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही केले. दुकानांमध्ये काेराेना नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची पडताळणीसुद्धा या वेळी करण्यात आली. तसेच अनेक व्यावसायिकांना काेराेना चाचणी केली की नाही याची विचारणा करून प्रमाणपत्रांचीसुद्धा पाहणी करण्यात आली. या वेळी स्थानिक नगर परिषद सदस्य जीवनानी, नगर परिषद अभियंता विजय घुंगरे व इतर न.प. कर्मचारी उपस्थित होते.
.........................
नियमांचे पालन न करणाऱ्यांची हयगय नाही
काेराेना संसर्ग पाहता सर्वांनी काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हे नियम न पाळणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
..............
जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वाशिम शहराचासुद्धा सहभाग आहे. शहरवासीयांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे शहरातील नागरिकांचीही खबरदारी लक्षात घेत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय काेणीही घराबाहेर निघू नये. नगर परिषदेतर्फे काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांना सहकार्य करावे व काेणताही वाद घालू नये. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- दीपक माेरे,
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम