वाशिम : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व रखडलेल्या योजनांवर थेट मुख्यमंत्र्यांनी ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून, ४ आॅक्टोबरपासून ‘व्हीसी’द्वारे यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे. तसे आदेश १ आॅक्टोबरला धडकल्याने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील प्रशासकीय यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे.प्रलंबित सिंचन प्रकल्पांसह रखडलेल्या शासकीय योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती संकलित करून आगामी ६ महिन्यांच्या कालावधीत सदर प्रकल्प आणि योजना पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यात सचिवांच्या समित्या देखील गठीत करण्यात आल्या असून अमरावती विभागाकरिता वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगर विकास आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, कृषि आयुक्त आणि तंत्रशिक्षण संचालक अशा पाच जणांची समिती कार्यान्वित असणार आहे. ४ आॅक्टोबरपासून स्वत: मुख्यमंत्री विभागनिहाय व जिल्हानिहाय अधिकाऱ्यांकडून प्रलंबित सिंचन प्रकल्प व योजनानिहाय कामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. यामाध्यमातून अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील ५ कामे, यवतमाळ जिल्ह्यातील ४, वाशिम जिल्ह्यातील ६, अकोला जिल्ह्यातील ९ आणि बुलडाणा जिल्ह्यातील ६ अशा एकंदरित ३० कामांचा सातत्याने आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा स्वत: मुख्यमंत्री घेणार असल्याबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला आहे. त्यानुसार, माहिती गोळा करणे सुरू आहे.
- शिवाजी जाधवकार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग, वाशिम