ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद स्तरावर २६ ते २८ जुलै दरम्यान कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. चिखली येथील ग्रामसेवकांची बदली झाल्याने येथे दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती होणे आवश्यक होते. मात्र, येथे ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. याबाबत सरपंच मनीषा रमेश अंभोरे यांनी पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा केला असता, प्रभार घेण्यास कुणी तयार नसल्याचे थातूरमातूर कारण दिले होते. ग्रामसेवकांअभावी प्रशासकीय कामकाज ठप्प असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी चिखलीचा प्रभार तातडीने अन्य ग्रामसेवकांकडे सोपविण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार १५ सप्टेंबरला मदन सदार यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला.
अखेर चिखलीला मिळाले ग्रामसेवक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:49 AM