शेती सिंचित होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी धरणाची निर्मिती केली. राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीला सुरुंग लावण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचे चिखली प्रकल्पावरून दिसून येते. शेतकरीबांधवांचे शिवार या धरणांनी हिरवेगार होईल आणि कुटुंबीयांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल या भाबड्या आशेने लाखमोलाच्या जमिनी शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्यात या धरणाच्या बांधकामाला दिलेल्या आहेत हे विशेष.
पाटबंधारे विभाग वाशिमच्या दुर्लक्षित धोरणाचा परिपाक म्हणजे मानोरा तालुक्यातील बहुतांश धरणांच्या भिंतीवरती झाडांची जंगले तयार झालेली आहेत. त्यानंतर कॅनॉलच्या दोन्ही बाजूलासुद्धा प्रचंड प्रमाणात झाडेझुडपे, काटेकुटे तयार होऊन धरणाच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणे अशक्य झालेले आहे.
केवळ कालव्यांची नासधूस व नादुरुस्ती हेच विषय नसून प्रचंड किमतीचे असलेली सांडवे नादुरुस्त असल्याने आणि धरणांच्या भिंतीही नादुरुस्त झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे. ओपन कालव्याऐवजी बंद नलिका वितरणप्रणालीद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल आणि गळती कमी होईल. तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम -सुफलाम होण्याकडे वाटचाल करेल, अशा चर्चा आता या धरणांच्या निमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. मानोरा तालुका आणि जिल्ह्यामध्ये धरणे असून धरणावरील अनागोंदीमुळे ७० टक्क्यांपर्यंत ही शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचित होत नसल्यामुळे या धरणांचे ऑडिट होणे आता अतिआवश्यक झाल्याचे सूरही शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे आणि उपविभागीय अभियंता सचिन शिंदे यांनी चिखली येथील धरण क्षेत्राला नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली आहे. त्यामुळे धरणाची काय व्यथा, स्थिती आहे हे संबंधितांच्या लक्षात आली. चिखली येथील धरणाप्रमाणेच फूलउमरी, पंचाळा, वाईगौळ, रतनवाडी, रुई गोस्ता, खापरदरी, आसोला, आमदरी या मानोरा तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील धरणांची अवस्था कमी-जास्त प्रमाणात सारखीच आहे.